Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
९–११ वर्षे
इंटरनेट, चित्रे आणि पॉर्नोग्राफी

माझे मित्र म्हणतात की ते पॉर्न पाहतात. ते काय असते?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “पॉर्न (शरीर व लैंगिक कृती अतिरंजितपणे दाखवणारे साहित्य /पॉर्नोग्राफी) म्हणजे नग्न लोकांचे किंवा सेक्सचे व्हिडिओ किंवा चित्रे. ती प्रौढांनी पाहण्यासाठी बनवलेली असतात. ती मुलांसाठी नसतात. ती अभिनय करून चित्रित केलेली असतात, त्यामुळे त्यात अनेकदा खरे नातेसंबंध, आदर किंवा संमती दिसत नाही. कधीकधी त्यात लोक उग्र किंवा निर्दयपणे वागताना दाखवलेले असतात. काही लोकांना ते पाहून वाईट वाटते, भीती वाटते किंवा गोंधळायला होते आणि ते सामान्य आहे.

तू असे काही पाहिले असशील तर मला सांगू शकतेस/शकतोस. तुला त्याबद्दल शिक्षा होणार नाही किंवा रागावले जाणार नाही. मित्रांनी तुला न पाहावेसे काही दाखवले, तर ‘मला नको आहे’ असे म्हण, तिथून निघून जा आणि मला सांग.”

किती सांगावं

पॉर्नोग्राफी या शब्दाची व्याख्या काही वाक्यांत करा. उदाहरणे दाखवू नका. “तू काय ऐकले किंवा पाहिले आहेस?” हे फक्त शांतपणे विचारा. मग दोन सुरक्षिततेचे संदेश द्या: ते मुलांसाठी नसते आणि असे काही समोर आले तर तू मला नेहमी सांगू शकतेस/शकतोस. तुमचा सूर शांत ठेवा.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता
  • ऑनलाइन दिसते ते खरे आयुष्य नसते
  • खऱ्या नातेसंबंधांमध्ये आदर आणि संमती असते
  • कुतूहल असण्याची किंवा अपघाताने पाहिल्याची लाज नसावी

काय बोलू किंवा करू नये

  • घाबरू नका, ओरडू नका किंवा फोन हिसकावू नका
  • आरोप करू नका (“तू नक्कीच ते पाहत असशील”)
  • “हे पाप आहे आणि तू आजारी पडशील” असे म्हणू नका
  • “शिकवण्यासाठी” एखादी क्लिप दाखवू नका
  • गुपचूप हेरगिरी हा प्रतिसाद म्हणून वापरू नका

पालकांसाठी टिपा

  • अनेक मुले अशी सामग्री पहिल्यांदा १०–१३ वर्षांच्या सुमारास, कधीकधी त्याहून आधी पाहतात. शेअर केलेले फोन, सोशल मीडिया, जाहिराती आणि मित्रांद्वारे हे समोर येऊ शकते. ते घडण्यापूर्वीच याबद्दलचा संवाद करा.
  • व्यावहारिक उपाय : पॅरेंटल कंट्रोल आणि सेफ सर्च, उपकरणे सामायिक जागेत ठेवणे, रात्री फोन बेडरूमच्या बाहेर चार्ज करणे आणि ठरवलेला नियम पाळणे : “काही अस्वस्थ करणारे दिसले, तर ते बंद कर आणि मला सांग.”
  • फक्त देखरेख करू नका, संवाद साधा. तुमच्याशी सुरक्षितपणे संवाद साधू शकणारी मुले ऑनलाइन जास्त सुरक्षित असतात.
  • तुमचे मूल त्रस्त दिसले किंवा असे काही सक्तीने पाहत असेल, तर समुपदेशकाशी बोला.
  • कोणी तुमच्या मुलाला उघड सामग्री पाठवली असेल, तर ती सुरक्षिततेची बाब समजा आणि सुरक्षिततेसंबंधी मार्गदर्शन पाहा.