Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

‘सहज’ काय आहे?

सहज: मुलांच्या सुरक्षित, सुदृढ आणि सन्मानपूर्ण वाढीसाठीचा कार्यक्रम

मुलांना सुरक्षित राहायला शिकवायला हवं. परंतु फक्त तेवढं पुरेसं नाही. त्यांना स्वतःला समजून घेता यावं, प्रश्न विचारता यावेत, स्वतःचे विचार आणि भावना व्यक्त करता याव्यात, सुदृढ नाती निर्माण करता यावीत आणि स्वतःच्या तसंच इतरांच्या हक्कांचा आदर करता यावा–यासाठीही त्यांना योग्य संधी आणि आधार मिळणं गरजेचं आहे.

सहज (सन्मान, हक्क, जबाबदारी) हा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचा सर्वंकष, वयानुरूप आणि विषयांची पुनरावृत्ती करत टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम आहे.

लैंगिकता म्हणजे केवळ लैंगिक संबंध किंवा शरीरात होणारे बदल नव्हे. आपलं शरीर, भावना, ओळख, नाती, संमती, लिंगभाव, सुरक्षितता, हक्क आणि जबाबदारी यांविषयीची समज ही मुलांच्या सर्वांगीण विकासाचा भाग आहे.

सहजमध्ये काय शिकवलं जातं?

माझं शरीर आणि माझी वाढ
शरीराची ओळख, बदल आणि मानवी विकास
माझ्या भावना आणि मी
भावना, आत्मभान आणि मानसिक स्वास्थ्य
माझी नाती
मैत्री, नातेसंबंध, नकाराचा स्वीकार आणि ठाम संवाद
माझी सुरक्षितता
छेडछाड, दादागिरी, वैयक्तिक सुरक्षितता आणि मदत मागण्याची क्षमता
माझ्या शरीरावर माझा हक्क
संमती, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि शारीरिक स्वायत्तता
लिंगभाव आणि समानता
सामाजिक समजुती, भूमिका, रूढी आणि लिंगभाव समानता
ओळख आणि विविधता
लिंगभाव ओळख आणि लैंगिक कल
विचार आणि निर्णय
चिकित्सक विचार, समस्या सोडवणं आणि जबाबदारीने निर्णय घेणं
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य
वयानुरूप माहिती, आरोग्य आणि काळजी
हक्क आणि जबाबदारी
स्वतःच्या आणि इतरांच्या हक्कांचा आदर आणि जबाबदार नागरिकत्व

सहजची काय खासियत आहे?

सहजमध्ये फक्त ‘काय शिकवायचं’ याचाच विचार नाही; तर ‘कसं शिकवायचं’ आणि मुलांच्या वाढीसाठी कसं वातावरण तयार करायचं यालाही तितकंच महत्त्व आहे. हा दृष्टिकोन पाच मूलभूत तत्त्वांवर आधारलेला आहे:
  • भीतीपेक्षा सकारात्मकता धोके आणि “काय करू नये” यापलीकडे जाऊन स्व-जाणीव, आत्मविश्वास, सुदृढ नाती आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं.
  • हक्कांपासून सुरुवात माहिती, प्रतिष्ठा, सुरक्षितता, आरोग्य आणि समानता हे प्रत्येक मुलाचे हक्क आहेत. स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवतानाच इतरांच्या हक्कांचा आदर करण्यास शिकणं.
  • विषयांची पुनरावृत्ती करत महत्त्वाच्या संकल्पना वेगवेगळ्या वयात पुन्हा येतात—प्रत्येक वेळी मुलांच्या वाढत्या समजुतीनुसार अधिक सखोलतेनं.
  • वयानुरूप आणि जीवनाशी जोडलेले वयाबरोबरच मुलांचे अनुभव, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि बदलतं वास्तव लक्षात घेऊन शिक्षण अधिक अर्थपूर्ण बनवणं.
  • वर्गाच्या पलीकडे मुले, शिक्षक, पालक, शाळेतील इतर कर्मचारी आणि समुदाय यांच्यासोबत काम करून प्रश्न विचारता येतील, संवाद साधता येईल आणि गरज पडल्यास आधार मिळेल असं वातावरण निर्माण करणं.

पुराव्यावर आधारित. वास्तवाशी जोडलेलं.

सहजची रचना युनेस्को (UNESCO) आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतर संस्थांनी विकसित केलेल्या इंटरनॅशनल टेक्निकल गायडन्स ऑन सेक्शुऍलिटी एज्युकेशन (ITGSE) मधील तत्त्वं आणि शैक्षणिक उद्दिष्टांच्या आधारे करण्यात आली आहे.