आमच्याविषयी
लैंगिकतेबद्दल समजून घेण्यासाठी, बोलण्यासाठी आणि शिकण्यासाठी
लैंगिकता हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. शरीर, भावना, आकर्षण, नातेसंबंध, ओळख, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, संमती आणि सुरक्षितता याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रश्न पडतात. पण या विषयांवर बोलण्यासाठी योग्य माहिती आणि विश्वासार्ह जागा नेहमीच उपलब्ध असते असे नाही.
लैंगिकतेबद्दलची अचूक, शास्त्रीय आणि समजण्यास सोपी माहिती उपलब्ध करून देणे हाच Let's Talk Sexuality संकेतस्थळाचा उद्देश आहे.
ही वेबसाइट केवळ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नाही. युवा, पालक आणि शिक्षक-प्रशिक्षक-समुपदेशक यांना लैंगिकतेबद्दल समजून घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि इतरांसोबत काम करण्यासाठी आवश्यक माहिती आणि संसाधनं मिळावीत, हा तिचा उद्देश आहे.
इथे तुम्हाला काय मिळेल?
युवांसाठी
शरीर, लैंगिकता, भावना, नातेसंबंध आणि लैंगिक व प्रजनन आरोग्य अशा विषयांबद्दल अचूक माहिती आणि प्रश्नांची उत्तरं. प्रयासला विचारा वर नाव न सांगता प्रश्न विचारता येतात. या विषयांवरचे पॉडकास्ट, व्हिडिओ आणि इतर संसाधनंही इथे उपलब्ध आहेत.
पालकांसाठी
मुलांशी शरीर, लैंगिकता, भावना, नातेसंबंध आणि सुरक्षिततेबद्दल त्यांच्या वयानुसार मोकळेपणानं संवाद कसा साधता येईल यासाठी माहिती आणि मार्गदर्शन.
प्रशिक्षकांसाठी
सर्वंकष लैंगिकता शिक्षणासाठी आवश्यक माहिती, लेख, पॉडकास्ट, व्हिडिओ, सादरीकरणाचं साहित्य आणि इतर संसाधनं. सहज (SAHAJ) या शाळांमधील कार्यक्रमासाठीची सत्रं आणि सत्रांसाठी लागणारं साहित्यही इथे उपलब्ध आहे.
आमची मूल्यं आणि दृष्टिकोन
सन्मान. हक्क. जबाबदारी. समानता. विविधता.
- लैंगिकता हा मानवी जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. त्यात शरीर, भावना, आकर्षण, ओळख, नातेसंबंध, जवळीक आणि सुरक्षितता यांचा समावेश होतो.
- प्रत्येकाला आपल्या वयानुसार आणि समजेनुसार योग्य माहिती मिळावी. प्रत्येकाला या विषयांवर मोकळेपणानं बोलता यावं.
- प्रत्येक व्यक्तीचा आदर व्हावा, तिला समान वागणूक मिळावी. प्रत्येक व्यक्तीला तिच्या शरीर, नातेसंबंध आणि आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असावा.
- निसर्गात विविधता आहे आणि लैंगिकतेतही. ही विविधता स्वीकारणं आणि तिचा आदर करणं महत्त्वाचं आहे.
- नातेसंबंध आणि लैंगिक अनुभव संमती आणि परस्पर आदरावर आधारित असावेत. दबाव, भीती किंवा बळाचा वापर योग्य नाही. संमतीच्या वैयक्तिक आणि कायदेशीर मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे.
- लैंगिक भावना स्वाभाविक आहेत. मात्र प्रत्येक भावना कृतीत आणणं आवश्यक नसतं. आपल्या निवडी आणि वागण्याच्या परिणामांची जबाबदारी आपलीच असते.
- मुलांना आणि युवांना अचूक आणि वयानुरूप लैंगिकता शिक्षण मिळणं ही पालक, शाळा आणि समाजाची सामायिक जबाबदारी आहे. योग्य माहितीमुळं त्यांना स्वतःचं शरीर, सीमा, संमती आणि सुरक्षितता समजून घेता येते आणि जबाबदारीनं वागता येतं.
या वेबसाइटमागची वाटचाल
२०१४
Let's Talk Sexuality ही वेबसाइट तथापि ट्रस्टनं २०१४ मध्ये सुरू केली. स्त्रिया आणि आरोग्य, लैंगिकता, हिंसा, समानता आणि आरोग्याशी संबंधित विषयांवर संसाधनं तयार करण्याचा तथापिचा दीर्घ अनुभव या कामामागं आहे.
२०२१
२०२१ मध्ये प्रयास आरोग्य गटानं या वेबसाइटची जबाबदारी स्वीकारली. आता वेबसाइटची पुनर्रचना करून तिचा आवाका वाढवला आहे. आता ही वेबसाइट केवळ युवांच्या प्रश्नांपुरती मर्यादित नसून युवा, पालक, प्रशिक्षक, समुपदेशक आणि लैंगिकतेवर काम करणाऱ्या इतर व्यक्ती आणि संस्थांसाठी एक संसाधन मंच म्हणून विकसित केली जात आहे.
प्रयासविषयी
प्रयास ही पुण्यातील सामाजिक संस्था आहे. १९९४ मध्ये प्रयासची अधिकृतरीत्या नोंदणी झाली. परंतु त्याआधीपासूनच प्रयास आरोग्य, ऊर्जा, शिक्षण आणि पालकत्व या क्षेत्रांत काम करत आहे.
प्रयासच्या आरोग्य गटाचं काम एचआयव्ही, लैंगिकता, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य व अधिकार, युवांचे आरोग्य, तसंच आरोग्याशी संबंधित संशोधन आणि सेवा या क्षेत्रांमध्ये आहे.
लैंगिकतेबद्दल संशोधनातून मिळणारं ज्ञान प्रत्यक्ष कामात आणणं आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारं ज्ञान पुन्हा संशोधनात आणि व्यवहारात वापरणं, हा प्रयासच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे.
संपादन: माहिती कशी तयार होते?
लैंगिकतेशी संबंधित माहिती अचूक, वैज्ञानिक आणि वाचायला सोपी असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रयास आरोग्य गटातील सहकारी या वेबसाइटवरील माहिती तयार करताना उपलब्ध संशोधन, मार्गदर्शक तत्त्वं आणि विश्वासार्ह स्रोतांचा आधार घेतात.
मजकुराचं संपादन आणि पुनरावलोकन विषयातील अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडून केलं जातं. गरजेनुसार लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, मानसशास्त्र, शिक्षण, मानवी हक्क अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जातं.
नवीन संशोधन आणि बदलत्या गरजांनुसार वेबसाइटवरील मजकूर वेळोवेळी अद्ययावत केला जातो.
विश्वासार्ह, अचूक, समजायला सोपी आणि प्रत्यक्ष उपयोगात आणता येईल अशी माहिती सहज उपलब्ध करून देणे.
लैंगिकतेविषयीची विश्वसनीय माहिती ज्यांना तिची गरज आहे, त्यांच्यासाठी मोफत व सहज उपलब्ध करून देण्यास आम्हाला मदत करा.
प्रयासला देणगी देऊन Let's Talk Sexuality ला सपोर्ट करा.
देणगी द्या