Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
६–८ वर्षे
गोपनीयता, मर्यादा आणि संमती

कोणी माझ्या खासगी अवयवांना स्पर्श केला तर चालते का?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “तुझे खासगी अवयव फक्त तुझेच आहेत. कोणीही त्यांना स्पर्श करू नये, तुला त्यांच्या अवयवांना स्पर्श करायला सांगू नये किंवा त्यांच्या खासगी अवयवांची चित्रे किंवा फोटो दाखवू नयेत. यात फक्त काही अपवाद आहेत : तुझ्या आरोग्यासाठी गरज असेल तर डॉक्टर किंवा नर्स तुला तपासू शकतात तेव्हा मी तुझ्यासोबत तिथे असेन. तू लहान असताना मी तुला अंघोळ घालायला मदत करायचे/करायचो आणि तुला स्वच्छ ठेवण्यासाठी ते करणे ठीक होते.

इतर कोणी तसे केले किंवा तुला ते गुपित ठेवायला सांगितले, तर ‘नाही! थांब!’ असे म्हण, इतर लोक असलेल्या सुरक्षित जागी जा, आणि मला किंवा दुसऱ्या विश्वासू मोठ्या व्यक्तीला लगेच सांग. यात तुझी चूक कधीच नसते. तुला ओरडा बसणार नाही.” “तू काय म्हणशील? तू कोणाला सांगशील?” असे विचारून त्या बोलण्याचा एकत्र सराव करा.

किती सांगावं

थोडक्यात, स्पष्टपणे आणि शांतपणे सांगा. वर्षभर ही माहिती छोट्या छोट्या भागांत पुन्हा सांगा. मूल म्हणू शकेल अशा एका वाक्याचा सराव करून घ्या, जसे की “थांब, मला हे आवडत नाही.” अत्याचारांची उदाहरणे आणि तपशील देऊ नका आणि मुलाला घाबरवू नका.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • शरीर मुलाचे स्वतःचे असते
  • मुलाला नाही म्हणण्याचा अधिकार आहे
  • सुरक्षिततेची जबाबदारी प्रौढांची आहे, मुलांची नाही
  • मुलाला दोष दिला जाणार नाही

काय बोलू किंवा करू नये

  • “वाईट स्पर्श” हा शब्द भीतीदायक पद्धतीने वापरू नका
  • “हे फक्त अनोळखी लोक करतात” असे म्हणू नका. अनेकवेळा असे अनुभव ओळखीच्या लोकांकडून येताना दिसतात
  • स्वतःचे संरक्षण करणे हे मुलाचे काम आहे असे सांगू नका
  • मुलाला न आवडणाऱ्या मोठ्या व्यक्तीसोबत एकटे राहायला भाग पाडू नका
  • मुलाने तुम्हाला काही सांगितले तर प्रश्नांचा भडिमार करू नका

पालकांसाठी टिपा

  • मुलांचा लैंगिक छळ अनेकदा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून होताना दिसतो (नातेवाईक, शेजारी, शिकवणी शिक्षक, ड्रायव्हर, मोठे मूल). मुलांना सांगा की हे तुमच्यासोबत कोणीही करू शकत नाही, तुमचे प्रेम किंवा आदर असलेली व्यक्तीही नाही.
  • मुलांमध्ये काही बदल होत आहेत ते पाहा. एखाद्या विशिष्ट व्यक्तीची भीती, दुःस्वप्ने, अंथरुण ओले करणे, अलिप्त राहणे, अचानक चिकटून राहणे. हे अत्याचाराचा पुरावा नाहीत मात्र या गोष्टी होत असल्यास त्याकडे लक्ष द्या. मुलांना हळूवारपणे विचारा: “तुला काही काळजी वाटते आहे का?”
  • तुमच्या मुलाने तुम्हाला त्यांना कोणामुळे काही त्रास होत असल्याचे सांगितले तर: शांत राहा, ऐका. म्हणा, “मला सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझा तुझ्यावर विश्वास आहे. यात तुझी चूक नाही.” चाइल्डलाइन १०९८, बालसंरक्षण कार्यालय, विश्वासू डॉक्टर किंवा समुपदेशक किंवा पोलीस यांची मदत घ्या. त्या व्यक्तीला एकट्याने जाब विचारू नका.
  • भारतात पॉक्सो कायदा १८ वर्षांखालील सर्व मुलांचे संरक्षण करतो.