बाळ गर्भाशयामध्ये वाढायला कसे सुरू होते?
काय सांगावं
सांगा: “पुरुषाकडून येणारी एक छोटीशी पेशी, जिला शुक्राणू (sperm) म्हणतात, आणि स्त्रीकडून येणारी एक छोटीशी पेशी, जिला बीजांड (egg) म्हणतात, ह्या एकत्र आल्या की दोन्हीची मिळून एक पेशी तयार होते. ती पेशी स्त्रीच्या गर्भाशयात साधारण नऊ महिने वाढून बाळ बनते.”
बाळ आईच्या आत कसे जाते?
जर तुमच्या मुलाने विचारले “शुक्राणू बीजांडाला कसा भेटतो?” तर म्हणा : “दोन प्रौढ व्यक्ती खासगी पद्धतीने एकमेकांच्या खूप जवळ यायचे ठरवू शकतात, अशा वेळी पुरुषाचे शिश्न स्त्रीच्या योनीमार्गामध्ये जाते आणि शुक्राणू बाहेर येतात. याला सेक्स म्हणतात. सेक्स ही कृती वयाने पुरेसे मोठे असलेल्या प्रौढांमध्ये, दोघांचीही पूर्ण सहमती असेल तरच घडते. ती एक खासगी कृती आहे.”
किती सांगावं
पहिल्या प्रश्नाचे उत्तर फक्त बीजांड, शुक्राणू आणि गर्भाशय एवढेच द्या. मुलाने ते कसे भेटतात असे विचारले तरच सेक्सबद्दलचे वाक्य सांगा. विचारल्यापेक्षा जास्त तपशील जोडू नका. थांबा आणि त्यांना कसे वाटते आहे ते पाहा. हा संवाद पुढे न्यायचा का नाही हे त्यांना ठरवू द्या.
कोणती मूल्यं रुजवावीत
- सोप्या शब्दांत सत्य
- कुतूहलाचे स्वागत आहे
- सेक्स खासगी आहे आणि सहमत असलेल्या प्रौढांसाठी आहे
- शरीराबद्दल लाज वाटण्यासारखे काही नाही
काय बोलू किंवा करू नये
- खोटी गोष्ट सांगू नका किंवा मुलाला आपल्याला हे माहीत नसले पाहिजे असे वाटू देऊ नका
- सेक्स घाणेरडा, पापकारक किंवा वाईट आहे हा संदेश देऊ नका
- उघड, अतिरंजित तपशील देऊ नका
- “लग्नानंतर तुला कळेल” असे म्हणू नका
पालकांसाठी टिपा
- मुले मित्रांकडून किंवा फोनवरून अर्धवट समजलेल्या किंवा वयानुरूप नसलेल्या आवृत्त्या ऐकतात. योग्य आवृत्ती आधी तुमच्याकडून ऐकल्यास तुम्ही विश्वासू स्रोत बनता.
- चर्चेनंतर जोडा: “प्रत्येक कुटुंब हे त्यांतील मुलाला/ मुलीला ही माहिती त्यांना योग्य वाटलेल्या वेळी समजावून सांगते. म्हणून आपण हे लहान मुलांना किंवा मित्र-मैत्रिणींना आपलेआपण समजावून सांगितले नाही पाहिजे.”
- तुम्हाला संकोच वाटत असेल तर मुलाला सांगा. भावनांबद्दल प्रामाणिक असणे याचे हे एक चांगले उदाहरण आहे.
