Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
१५–१८ वर्षे
गर्भधारणा आणि प्रजनन

लोक गर्भधारणा आणि HIV सारखे संसर्ग कसे टाळू शकतात?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “शिश्न-योनी लैंगिक संबंध न करणे हा यासाठी एकमेव १००% खात्रीचा मार्ग आहे आणि अनेक तरुण तसा निर्णय घेऊ शकतात. एखाद्या व्यक्तीने सेक्स केलाच, तर कंडोम (पुरुषांसाठीचा किंवा स्त्रियांसाठीचा) प्रत्येक वेळी योग्य प्रकारे वापरल्यास गर्भधारणेची आणि HIV सारख्या संसर्गांची शक्यता कमी होते. इतर पद्धती, जसे की रोज घेण्याच्या गोळ्या, कॉपर-टी (IUD) आणि इंजेक्शने, गर्भधारणा रोखतात पण आजाराच्या संसर्गांपासून संरक्षण देत नाहीत. वीर्य बाहेर येण्याआधी लिंग योनीतून बाहेर काढणे (withdrawal) आणि ‘सुरक्षित दिवस’ मोजणे हे विश्वासार्ह मार्ग नाहीत.

कंडोम फाटला किंवा कोणतेही संरक्षण वापरले नसेल, तर आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या जितक्या लवकर घेतल्या जातील तितक्या गर्भधारणा रोखण्याचे काम चांगले करतात. शक्यतो ७२ तासांच्या (३ दिवसांच्या) आत त्या घ्याव्या. त्या आजाराच्या संसर्गांपासून संरक्षण देत नाहीत, म्हणून त्यासाठी डॉक्टरांना भेटणे आणि तपासणी करणे चांगले. डॉक्टर, ANM किंवा आरोग्य कार्यकर्ते योग्य आणि खासगी प्रकारे सल्ला देऊ शकतात. सेक्स नेहमी स्वतःच्या निवडीने आणि संमतीने केला गेला पाहिजे, आणि भारतीय कायद्यानुसार १८ वर्षांखालील कोणीही कायदेशीररित्या संमती देऊ शकत नाही, म्हणून तोपर्यंत थांबणे हा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे.”

किती सांगावं

आवश्यक त्या सर्व गोष्टी सांगा. त्यांना गरज पडल्यास मदत कुठे मिळेल हेही सांगा. याचा अर्थ तुम्ही त्यास प्रोत्साहन देत आहात असे नाही. पण तुमचे मूल लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसले तरीदेखील ही माहिती उपयुक्त आहे. त्यांनी त्यांचा त्यांचा अंदाज बांधण्यापेक्षा किंवा चुकीच्या स्त्रोतांतून माहिती घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलणे कधीही चांगले.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • माहितीपूर्ण निवड
  • दोन्ही जोडीदारांची सामायिक जबाबदारी
  • आरोग्य आणि संमती
  • काळजी घेण्याविषयी बोलण्यामध्ये लाज वाटण्याची गरज नाही

काय बोलू किंवा करू नये

  • “चांगली मुले असले प्रश्न विचारत नाहीत” किंवा “कंडोम वाईट लोकांसाठी असतात” असे म्हणू नका
  • भीतीदायक गोष्टी सांगू नका
  • गैरसमज सांगू नका (जसे की सेक्सनंतर योनी धुतल्याने गर्भधारणा टळते)
  • तुमच्या ज्ञानापलीकडचा सल्ला देऊ नका
  • कंडोम सहज उपलब्ध असणे म्हणजे अठरा वर्षांपूर्वी ते वापरण्यास परवानगी आहे असे मानू नका

पालकांसाठी टिपा

  • गर्भनिरोधनाविषयी अचूक माहिती दिल्याने किशोरवयीन मुले सेक्स लवकर सुरू करतील हा गैरसमज आहे. ज्यांना ती तुमच्याकडून मिळत नाही, ते ती मित्र, पॉर्न किंवा गैरसमजांमधून मिळवतात.
  • भारतात कंडोम आणि आपत्कालीन गोळ्या औषधांच्या दुकानांमध्ये मिळतात, पण किशोरवयीन मुलांना त्या विकत घेताना खूप संकोच वाटू शकतो. त्यांच्यासोबत जाण्याची तयारी दाखवा, किंवा कुठे जाणे सुरक्षित आहे ते सांगा.
  • तुमचे मूल आधीच लैंगिकदृष्ट्या सक्रिय असेल, तर ते समजल्यास शांत राहा आणि त्यांना दोष देण्यावर नाही तर त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करा.
  • मदत कुठे मिळेल: फॅमिली डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ज्ञ, ANM किंवा आशा कार्यकर्ती, किंवा उपलब्ध असेल तिथे किशोरवयीन-स्नेही आरोग्य केंद्र.

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा