वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला लागते. हे आकर्षण तीन प्रकारचं असू शकतं. भिन्नलिंगी, समलिंगी किंवा उभयलिंगी.
अनेक मुलांना भावनिक आणि लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. अनेक मुलींना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. याचा अर्थ या मुलांचा किंवा मुलींचा लैंगिक किंवा भावनिक आकर्षणाचा कल विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे असतो. अशा विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे असणाऱ्या लैंगिक किंवा भावनिक कलाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला हेटरोसेक्शुअल म्हणतात.
काही मुला-मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटतं. मुलींना मुलं आणि मुली दोघांबद्दल लैगिक आकर्षण वाटतं आणि मुलांना देखील मुलं आणि मुली दोघांबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण निर्माण होतं. अशा आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल असं म्हणतात. उभयलिंगी कल असणाऱ्या व्यक्ती गोंधळलेल्या असतात असा मात्र याचा अर्थ होत नाही. एका व्यक्तीला एकाच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे असा काही निसर्गाचा नियम नाही.
काही मुला-मुलींना केवळ त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. म्हणजेच मुलांना फक्त मुलांबद्दल आणि मुलींना फक्त मुलींबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ या मुला-मुलींचा लैंगिक-भावनिक आकर्षणाचा कल समलिंगी असतो. अशा व्यक्तींना समलिंगी कलाच्या किंवा समलिंगी व्यक्ती म्हणतात. इंग्रजीत समलिंगी मुलांना किंवा पुरुषांना गे म्हणतात तर समलिंगी मुली किंवा स्त्रियांना लेस्बियन म्हणतात.
कोणत्याही व्यक्तीबाबत निर्माण होणारं लैंगिक आकर्षण नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. त्यात चुकीचं असं काहीही नाही.
यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्व प्रकारचे लैंगिक कल स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत. भिन्नलिंगी कल हा नॉर्मल आणि बाकीचे अबनॉर्मल, विकृत हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. समलैंगिकता किंवा उभयलैंगिकता काही आजार नाही. त्यामुळे त्यावर कसले उपाय करण्याची गरज नाही किंबहुना कोणत्याच उपायाने (समुपदेशन, औषध गोळ्या, गंडे दोरे, सक्तीने केलेलं लग्न) लैंगिक कल बदलता येत नाही. ज्याला त्याला आपलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे जगता आलं पाहिजे. त्यामुळे आपणही सर्व प्रकारच्या लैंगिक कल असणाऱ्या व्यक्तींचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. त्यांच्यावर होणाऱ्या भेदभावाला विरोध केला पाहिजे.
काही जण अलैंगिक (Asexual) असतात. म्हणजेच काही जणांना कुणाही विषयी लैंगिक आकर्षण वाटत नाही. लैंगिक संबंध न ठेवणं किंवा ब्रह्मचर्य आणि अलैंगिकता यामध्ये मात्र फरक आहे. लैंगिक संबंध न ठेवण्याची किंवा लैंगिक नाती न जोडण्याची कारणं सामाजिक किंवा सांस्कृतिक असू शकतात. पण अलैंगिकता म्हणजे मुळातूनच लैंगिक आकर्षण न वाटणं.
अलैंगिक असणाऱ्या व्यक्ती प्रेम किंवा लग्नाची नाती जोडू शकतात. पण त्यामध्ये लैंगिक आकर्षण असेलच असं नाही. अलैंगिक असणं, लैंगिक भावना किंवा इच्छा नसणं हे स्वाभाविक नॉर्मल आहे. आपल्यामध्ये काही तरी कमी आहे असं मानण्याची किंवा स्वतःला अपराधी मानण्याचं कारण नाही.
लैंगिक कल, आवड, इच्छांचा विचार करताना त्यातील वैविध्य समजून घेणं आवश्यक आहे.




