लैंगिक समाधानासाठी संभोगाइतकेच प्रणयाला देखील महत्व आहे. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. त्यामुळे संभोगाआधी काही वेळ फोरप्ले करावा.
प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. आपल्या जोडीदाराला कोणत्या अवयवांना स्पर्श केल्याने किंवा कोणत्या लैंगिक कृतीतून सुख मिळते हे संवादातून समजू शकतं.
स्त्रियांना लैंगिक उत्तेजना मिळण्यामध्ये फोरप्ले खूप महत्वाचा असतो. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होत नाही. योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते (लेखाच्या खाली लिंक दिली आहे).
कोणतीही लैंगिक कृती करताना मग ती फोर प्ले असो अथवा संभोग, ती कशी करायची, कुठे करायची दोन्ही जोडीदारांनी मिळून ठरवावे. सर्वप्रथम तुमची आणि तुमच्या जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचाही विचार व्हायला पाहिजे. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. प्रणयासोबतच लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.




